Wednesday, August 15, 2012

कॅप्टन लक्ष्मी सहगल को लाल सलाम

किरण मोघे

२३ जुलै रोजी सकाळीच दूरचित्रवाणी वर कॅप्टन लक्ष्मी सहगल ह्यांच्या दुखद निधनाची बातमी बघताना मन खिन्न झाले. जनवादी महिला संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक कार्यकर्ती ह्या नात्याने त्यांच्या सहवासात घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी उजळून आल्या. हस्तांदोलानाच्या त्यांच्या कोमल स्पर्शातून, प्रेमळ आवाजातून त्या आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना आपलंसं करून घेत. पण कोणत्याही प्रकारच्या अन्याय-अत्याचाराला मात्र अतिशय कणखरपणे प्रखर विरोध करीत असत. २०१० मध्ये कानपूर येथे संघटनेचे १०वे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेव्हा आपल्या उद्घाटनाच्या संदेशात सर्व प्रतिनिधींना “रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत रहा” असे आवाहन त्यांनी केले तेव्हा सभागृहात प्रचंड स्फूर्तीदायक आणि रोमांचकारी झालेले वातावरण अजूनही मला आठवते.

कॅप्टन लक्ष्मी ह्यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे २४ ऑक्टोबर १९१४ साली झाला, त्यांचे वडील एस. स्वामीनाथन हे मद्रास हाय कोर्टातले प्रख्यात वकील होते, तर त्यांची आई अम्मूकुट्टी ह्या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसेविका आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या. अशा आर्थिक-सामाजिक दृष्ट्या संपन्न कुटुंबात स्वातंत्र्य आंदोलनाचे त्यांना बाळकडू मिळाले. तरुण वयातच लक्ष्मी स्वामीनाथनने उत्साहाने ब्रिटीश साम्राज्यवादाविरोधी राष्ट्रीय चळवळीत उडी मारली. परकीय वस्तूंची होळी करताना स्वतःचे महाग कपडे व खेळणी जाळताना त्यांना अजिबात वाईट वाटले नाही. पैसे कमवण्याचे साधन म्हणून नव्हे तर गरिबांची, आणि विशेष करून गरीब स्त्रियांची सेवा करता यावी म्हणून त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि १९३८ साली एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली.

१९४० साली २६ वर्षांच्या लक्ष्मी सिंगापूर साठी रवाना झाल्या. तिथे गरीब स्थलांतरित भारतीय मजुरांसाठी दवाखाना सुरु केला. स्वातंत्र्य आंदोलनाशी आणि विशेष करून आय.एन.ए.शी संबंधित तिथल्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला. १९४३ साली नेताजी सुभाषचंद्र बोसने सिंगापूरला भेट दिली. नेताजींना आझाद हिंद सेनेमध्ये महिलांना भरती करायचे आहे हे लक्ष्मींच्या कानावर आले होते, आणि दोघांची ऐतिहासिक भेट झाली. तिथून लक्ष्मीच्या आयुष्याने एक वेगळे आणि क्रांतिकारक वळण घेतले. आझाद हिंद सेनेच्या “राणी झांसी रेजिमेंटची” स्थापना करून त्याचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. आज जणू एक दंतकथा बनलेल्या झुंजार “कॅप्टन लक्ष्मी” जगासमोर आल्या. डिसेंबर १९४४ मध्ये बर्माच्या जंगलात ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी सशस्त्र लढ्यात त्या सक्रियतेने सामील झाल्या. १९४५ मध्ये त्यांना ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेतले, व काही काळ बर्माच्या जंगलातच कैदेत ठेवले. ४ मार्च १९४६ रोजी त्यांना भारतात आणले गेले, परंतु जनतेने ज्यापद्धतीने त्यांचे स्वागत केले ते पाहून त्यांना कैदेत ठेवण्याचा धोका ब्रिटिशांनी ओळखला व त्यांना मुक्त केले.  

आझाद हिंद सेनेतील त्यांचे सहकारी कर्नल प्रेमकुमार सेहगल ह्यांच्याशी १९४७ मध्ये लाहोर येथे त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर कानपूर दोघांनी कानपूर येथे बिऱ्हाड केले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठ्या संख्येने येणाऱ्या निर्वासितांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. परिणामी त्यांनी हिंदु आणि मुस्लिम, दोन्ही समाजांचा विश्वास संपादन केला. १९८४ च्या शीख विरोधी दंगलीत त्यांनी स्वतः जाऊन आसपासच्या शिखांच्या घरांचे आणि दुकानांचे संरक्षण केले.

कानपूरच्या कष्टकऱ्यांच्या वस्तीत त्यांनी छोटेसे प्रसुतीगृह सुरु केले, ज्याच्याशी त्यांचा शेवटपर्यंत रोजचा प्रत्यक्ष संपर्क राहिला. कानपूर शहरात गरीबांप्रति त्यांचा कनवाळूपणा प्रख्यात होता. गरज पडेल तिथे त्या आपली सेवा देण्यासाठी धावून जात. बांगलादेश युद्धाच्या काळात त्यांनी कलकत्त्याला जाऊन तेथील निर्वासितांमध्ये काम केले, तर भोपाळ दुर्घटनेनंतर त्यांनी स्वतः एका वैद्यकीय पथकाचे नेतृत्व करून विषारी वायूचे गर्भवती स्त्रियांवर किती भीषण परिणाम झाले आहेत ह्याचा सविस्तर अहवाल सादर केला.

कलकत्त्यात असताना त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आला आणि त्या डाव्या चळवळीत सक्रीय झाल्या. सुरुवातीला कामगार चळवळ, आणि नंतर महिला आंदोलनात त्या काम करू लागल्या. १९८१ साली अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची स्थापना झाली तेव्हा त्या त्याच्या उपाध्यक्षा झाल्या व संघटनेच्या सर्व लढ्यांमध्ये आणि मोहिमांमध्ये त्यांचा अतिशय सक्रीय सहभाग होता. स्त्री-देहाचे बाजारीकरण करणाऱ्या १९९६च्या  बंगलोरच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेला विरोध करण्यासाठी त्यांनी अटक सुध्दा करून घेतली होती.

१९८८ मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले. परंतु त्याचे त्यांना फारसे सोयरसूतक नव्हते! २००२ साली डाव्या पक्षांनी त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रा.लों.आ. आघाडीचे उमेदवार ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या विरोधात आपला उमेदवार म्हणून उतरवले. आपण ही निवडणूक जिंकू शकत नाही ह्याचे पूर्ण भान असताना त्यांचा उत्साह किंचितही डळमळला नाही. अन्याय आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि पर्याय मांडण्याची एक संधी म्हणून त्यांनी त्याकडे पहिले आणि झंझावती प्रचार केला. स्वतंत्र भारतात लोकशाही आणि समाजवाद बळकट करण्याची हाक देऊन साम्राज्यवाद-विरोधी धर्मनिरपेक्ष परंपरा जागवून त्यानी देशभरातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला.

शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही अधिकार, समानता आणि स्त्री-मुक्तीसाठी लढा चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार चकित करणारा होता. परिवर्तनावर त्यांचा अढळ विश्वास होता. आमच्या पिढीच्या कार्यकर्त्यांना चटकन निराश व्हायला होते. अशा वेळी कॅप्टन लक्ष्मी सहगल ह्यांची आठवण डोळ्यात आणि हृदयात साठवून पुढील वाटचाल करायला हवी.

No comments:

Post a Comment