Sunday, August 11, 2019

दक्षिण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनतेला आवाहन

(Photo: The Hindu newspaper)

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण कोल्हापूर, सांगली
आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीने अतोनात हानी
झाली आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीत पुरातून सुटका करणारी
बोट बुडाल्याने १६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. सांगली जिल्ह्यातील
अनेक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यांना
महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे
ओसंडून वहात असून सर्वच्या सर्व नद्यांनी धोक्याची
पातळी ओलांडून त्यांच्या पुराचे पाणी गावागावात घुसले आहे

हा या भागाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात भयानक महापूर असून
गेल्या दिवसात ५०० मिमी आणि ऑगस्ट या दोन दिवसात
१३० मिमी पाऊस झाला. सर्व धरणांच्या क्षेत्रात मोठा पाऊस
झाल्याने त्यातील पाणी एकाच वेळी सुटल्याने गंभीर पूर परिस्थिती
निर्माण झाली. अर्धे कोल्हापूर शहर, ७० टक्के सांगली शहर
तसेच कराड शहराचा काही भाग पाण्याखाली गेला असून तिन्ही
जिल्हयातील ५००हून अधिक गावांचे अतोनात नुकसान झाले आहे

६० हजार हेक्टरहून अधिक शेती पाण्यात गेली असून त्यातील
खरीपाची पिके आणि भाजीपाला नष्ट झाला आहे. शेतकऱ्यांनी
पाळीव जनावरे वाचावीत म्हणून सोडून दिल्याने त्यांच्यावर
नवे संकट ओढवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच ३० हजारहून
अधिक लोकांना तात्पुरता आसरा शोधावा लागला असून तिन्ही
जिल्ह्यातील सुमारे पाच लाख लोकांचे जीवन या महापुराने
उध्वस्त झाले आहे. कोल्हापुरासहित कित्येक गावे आणि शहरांचा
इतर भागाशी संपर्क तुटला आहे. कराडची पाटणकर कॉलनी
झोपडपट्टी आणि वाईच्या कातकरी वस्तीतील शेकडो घरे उध्वस्त
झाली आहेत.           

या सर्व परिस्थितीत जनतेने स्वयंस्फूर्तपणे अभिनंदनीय अशी 
मदत पूरग्रस्तांना केली आहे. त्यांच्या निवाऱ्यापासून ते
खाण्यापिण्याची सोय जनतेच्या पुढाकाराने झाली आहे.
प्रशासन मात्र बहुतेक ठिकाणी ठप्प असल्याच्या रास्त तक्रारी
हजारों पूरपीडितांनी केल्या आहेत.

या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर रूप धारण करणार
आहे. पूर ओसरल्यानंतर घराकडे जाणाऱ्या जनतेला पडकी घरे,
वाहून गेलेले धान्य आणि इतर वस्तू, तसेच पुरानंतर पसरू शकणारी
रोगराई या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना
तातडीने खाण्यापिण्याची, वैद्यकीय सेवेची आणि औषधपाण्याची
व्यवस्था करावी लागणार आहे. पडझडीचा अंदाज घेऊन इमारतींची
दुरुस्ती करावी लागणार आहे. या भागात अल्पभूधारक
शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासोबतच शेतमजुरांनाही
दैनंदिन उदरनिर्वाहाच्या समस्या भेडसावणार आहेत.
कामगारांच्या घरांसोबतच त्यांचा रोजगार बुडाला आहे. शालेय मुलामुलींना
शालेय साहित्याची त्वरीत गरज भासणार आहे.

अशा परिस्थितीत या पूरग्रस्तांची धान्य, घरातील वस्तू, कपडे,
शालेय साहित्य, औषधे आदींची गरज  भागवण्यासाठी जनतेने
पुढे यावे; दैनंदिन खाद्यपदार्थांसाठी कोरड्या धान्याची बंद पाकिटे
आणि संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी, तातडीचा खर्च
भागवण्यासाठी अधिकाधिक निधी द्यावा असे आवाहन
जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. पक्षाच्या
आणि जनसंघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कामी त्वरित पुढाकार घ्यावा

वस्तूरूपाने जे साहित्य जमा होईल ते 'जनशक्ती', वरळी,
मुंबई या पक्षाच्या राज्य कमिटीच्या कार्यालयात पाठवावे.
तेथून पूरपीडित जनतेत त्याच्या वितरणाची व्यवस्था केली जाईल.

पूरग्रस्त निधीची रक्कम पक्षाच्या राज्य कमिटीच्या पुढील
बँक खात्यात जमा करावी आणि त्याची माहिती
राज्य कोषाध्यक्ष कॉ. महेंद्र सिंह यांच्या ९८६९३०३६६६ या
व्हाट्सअप्प नंबरावर अवश्य कळवावी.

COMMUNIST PARTY OF INDIA (MARXIST)
MAHARASHTRA STATE COMMITTEE
PUNJAB NATIONAL BANK
WORLI NAKA BRANCH
ACCOUNT NUMBER - 0564000113271383
IFSC CODE - PUNB0056400, 
MICR CODE - 400024033

नरसय्या आडम
सचिव, महाराष्ट्र राज्य कमिटी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

जीवन मार्ग - अंक क्र . ३१: ४ ते १० ऑगस्ट २०१९