*वारली आदिवासींच्या ऐतिहासिक उठावाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करू या!*
*२३ मे १९४५ ते २३ मे २०२०*
७५ वर्षांपूर्वी, ७ जानेवारी १९४५ रोजी ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य किसान सभेची स्थापना झाली. तलासरीचे माह्या धांगडा व इतर १४ आदिवासी प्रतिनिधींनी, जमीनदार-सावकारांनी त्यांच्यावर वर्षांनुवर्षे लादलेली वेठबिगारी, लग्नगडी पद्धत, बेसुमार लूट व अनन्वित अत्याचारांची संतापजनक परिस्थिती या अधिवेशनात मांडली.
२३ मे १९४५ रोजी तलासरी तालुक्यात झरी या गावी डहाणू व तलासरी तालुक्यांतील ५,००० आदिवासी स्त्री-पुरुष जमले. कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली ही सभा बोलावली गेली. कॉ. शामराव परुळेकर आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांनी वेठबिगारी व लग्नगडी पद्धत नष्ट करण्याची हाक दिली. आणि देशभर गाजलेल्या अभूतपूर्व वारली आदिवासी उठावाची सुरुवात झाली.
लाल बावट्याखाली झालेल्या आदिवासींच्या बुलंद एकजुटीतून, त्यागातून आणि संघर्षातून रानटी वेठबिगारी आणि लग्नगडी पद्धत काही महिन्यातच नष्ट करण्यात आली. मजुरीवाढीच्या व वनाधिकाराच्या, जमिनीच्या, पाण्याच्या, अन्नाच्या, रोजगाराच्या, शिक्षणाच्या व आरोग्याच्या हक्काच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आदिवासी उठावाने पुढे यशस्वीरीत्या हात घातला. ह्या प्रश्नांवरील लढे राज्यभर आणि देशभर सुरू आहेत आणि ते वाढणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांपर्यंत, आणि नंतर नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, नांदेड, यवतमाळ व इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांपर्यंत लाल बावट्याची तेजस्वी चळवळ पसरली आणि वाढत गेली.
जेठ्या गांगड पासून ते लक्ष्या बीज, बाबू खरपडे, मथी ओझरे व प्रदीप धोदडेपर्यंत ठाणे-पालघर जिल्ह्यातील ६१ आदिवासी हुतात्म्यांना ब्रिटिश, काँग्रेस आणि भाजप सरकारांच्या पोलिसांच्या व गुंडांच्या पाशवी दडपशाहीमुळे वीरमरण आले. नाशिक जिल्ह्यातील लक्ष्मण बागुल याच्यासह ३ हुतात्मे धारातीर्थी पडले.
गेली ७५ वर्षे चार पिढ्यांतील लाखों लोकांच्या संघर्षांतून, प्रबोधनातून आणि संघटनेतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तसेच किसान सभा, सीटू, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांची चळवळ अनेक ज्वलंत प्रश्नांवर अविरत सुरूच आहे. इतर सर्व पुरोगामी, जनवादी व धर्मनिरपेक्ष शक्तींना आपण सोबत घेऊ या! शोषणमुक्त समाजासाठीचा आपला संघर्ष आपण जास्त व्यापक, तीव्र व बुलंद करू या!
*या ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा झालाच पाहिजे.*
त्यासाठी
*येत्या २३ मे रोजी प्रत्येक गावात, पाड्यात आणि घरावर लाल बावटे अभिमानाने फडकवू या!*
*कॉ. शामराव परुळेकर, कॉ. गोदावरी परुळेकर, कॉ. नाना मालुसरे, कॉ. कृष्णा खोपकर, कॉ. के. के. पवार, आपले असंख्य दिवंगत आदिवासी योद्धे आणि आपले ६४ हुतात्मे यांचे विनम्र स्मरण करू या!*
*कोरोना काळात पुन्हा एकदा अत्यंत हृदयशून्य, श्रमिकविरोधी, धनिकधार्जिणे, धर्मांध आणि भ्रष्ट ठरलेल्या भाजपच्या मोदी-शहा सरकारविरुद्ध आणि श्रमिकांच्या ज्वलंत मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या देशव्यापी हाकेनुसार २७ मे रोजी शारीरिक अंतर पाळून गावागावात जोरदार निदर्शने करू या!*
*आपलेच*
*डॉ. अशोक ढवळे*
*जे. पी. गावीत*
*किसन गुजर*
*बारक्या मांगात*
*अर्जुन आडे*
*डॉ. अजित नवले*
No comments:
Post a Comment